सिंचन विकासकामांना गती द्या -जलसंपदामंत्री पाटील

Foto
औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची टंचाई भेडसावत असते. मराठवाड्यातील पाण्याची आवश्यकता पाहता अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल (शनिवार) येथील जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात अधिकार्‍यांची बैठक घेऊन मराठवाडा विभागातील सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ना. व. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए. पी. आव्हाड, लाभक्षेत्र विकासचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक डी. डी. तवार, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता के.बी.कुलकर्णी आदींसह विविध प्रकल्पांचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.  खोरेनिहाय महाराष्ट्रातील सिंचन क्षमता, गोदावरी, कृष्णा, तापी, कोकण, नर्मदा नदी खोर्‍यातील उपलब्ध पाणी आणि तूट, महामंडळांतर्गत निर्मित पाणीसाठा, सिंचन क्षमता, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना, नदीजोड प्रकल्प व प्रवाही वळण योजना, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्प, नांदेड जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प, लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प, बीड जिल्ह्यातील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्‍वर प्रकल्प टप्पा 2, पैठण येथील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उर्ध्व प्रवरा (निळवंडे 2) आदींसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाटील यांनी या बैठकीत घेतला. अपूर्ण प्रकल् त्वरित पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. सुरुवातीला कार्यकारी संचालक शिंदे यांनी जलसंपदामंत्री   पाटील यांचे स्वागत केले. तसेच महामंडळाच्या कामकाजाचे  सविस्तर सादरीकरण केले. तवार यांनी आभार मानले.